Sanjay Shirsat On Sanjay Raut : "तर अब्रुनुकसानीचा दावा...", संजय शिरसाट यांचा राऊतांना इशारा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देताना, राऊत यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी माफी मागितली नाही, तर पोलिसांत फौजदारी तक्रार दाखल करण्यात येईल, असेही शिरसाट यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिरसाट म्हणाले, “संजय राऊत यांनी माझ्या बेडरूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका बॅगेत नोटांचे बंडल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र हा व्हिडीओ पूर्णपणे मॉर्फ केलेला असून, माझी बदनामी करण्यासाठी खोट्या पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे.”
शिरसाट पुढे म्हणाले, “राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाऊ शकते, हे पाहून धक्का बसतो. अशा राजकीय नीतिमत्तेचा अभाव असलेल्या नेत्यांना धडा शिकवणं आवश्यक आहे. त्यामुळे संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येणार असून, त्यांनी जर माफी मागितली नाही, तर त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करू.”
ते म्हणाले, “विरोधक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे त्यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत, पण सध्या ते बाहेर काढण्याची इच्छा नाही. मात्र जर त्यांनी गरळ ओकली, तर मीही त्यांच्या भाषेत उत्तर देईन.” दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याबाबत विचारले असता शिरसाट म्हणाले, “जयंत पाटील यांची घुसमट आता थांबली असावी.”