पितृपक्षावरुन भास्कर जाधव अन् शंभूराजे देसाईंमध्ये वाकयुध्द
मुंबई : नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमने-सामने आले आहेत. यावरुन ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे सरकारचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्यात चांगलेच शाब्दिक युध्द रंगले होते. अखेरीस तुमच्यासाठी वाडी ठेवण्याची मला वेळ आणू नका, असा इशाराच जाधव यांनी शंभूराज देसाई यांना दिला.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या थेट जनतेतून नगराध्यपद निवडीच्या बिलालावर आक्षेप घेतला. जाधव आपलं भाषण करत असताना शिंदे गटातील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, काय काय असं म्हणू लागले. यावर भास्कर जाधव यांनी 'काव काव काय करतोय, पितृपक्ष येत असेल म्हणून करत असेल, असा टोला लगावला आहे.
त्यावर शंभूराजे देसाई यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले, तू काव काव करत आहेस. त्यावर भास्कर जाधव पुन्हा म्हणाले, मी पितृपक्षात माझ्या आई-वडिलांना वाडी ठेवताना काव काव म्हणतो, नाहीतर मला तुमच्यासाठी वाडी ठेवण्याची वेळ आणू नका, असा इशाराच जाधव यांनी शंभूराज देसाई यांना दिला.
आपल्या भाषणामध्ये बोलताना जाधव यांनी थेट नगराध्यपद निवड प्रक्रियाला विरोध दर्शवताना ते म्हणाले, 'या बिलामध्ये नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याची तरतूद कुठे आहे. नगराध्यक्ष चुकीचा आहे त्याला बोलावण्याचा अधिकार कुठे आहे? त्या नगराध्यक्षाने कसेही वागावे अशी माणसे निरंकुश होतात आणि ती होणार नाहीत असं देखील सांगत येत नाही.
मुख्यमंत्री तुम्ही हे विधेयक थांबवा, तुमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे तुम्ही ते मंजूर करून घ्याल. 13 कोटी लोकसंख्येच्या राज्यात 56 ते 57 टक्के लोक शहरात राहतात. शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवन नरक यातनेसारखे झाले आहे. नगरविकास विभागाची स्वतंत्र यंत्रणा काय आहे? त्यांचा स्वतंत्र अधिकारी वर्ग नाही, असे प्रश्न जाधव यांनी उपस्थित केले.

