Supriya Sule
Supriya Sule

Supriya Sule : 'विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून...'; माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Supriya Sule) माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोकाटे यांचा मोबाईलवर 'रमी' गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर विरोधकांनी जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखाते काढून घेण्यात आले आहे. तर राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे हे कारभार पाहणार आहेत. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे.'

'महाराष्ट्र शासनाला 'भिकारी' म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली.'

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, 'एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे.' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com