धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत; उध्दव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
मुंबई : रामनवमीनिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. यानिमित्त मुंबईत उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानीही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नीहाल पांडे या शिवसैनिकाने रामटेक राममंदिर येथून महाभारत यात्रा केली. या शिवसैनिकाचे कौतुक करताना उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले की, रामटेक ते इथपर्यंत पायी येणे ही हिंमत आहे. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. एका दृष्टीने पाहिलं, तर असं कुणीतरी कुणासाठीतरी इतके किलोमीटर पायपीट करणं आत्ताच्या काळात अशक्य आहे. तुम्हाला मातोश्रीत यावे आणि माझ्यासोबत उभे राहावे असे वाटणे हा मी रामाचा आशीर्वाद मानतो. रामटेकमधून निघून तुम्हीबरोबर राम नवमीला इथे पोहोचलात. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
लोकशाही वाचवणे हे केवळ माझ्या एकट्याचे काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही. आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का, असे म्हणत ते पुढे म्हणाले, तेव्हा प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन दगड टाकला, तरी तो तरंगायचा. आत्ता राजकारणात तेच झाले आहे. प्रभू रामाचे नाव घेऊन दगड तरंगतायत. आणि दगडच राज्य करतायत. मग खऱ्या रामभक्तांनी करायचं काय? ते रामभक्तांचं काम मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, असेही उध्दव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

