Uddhav Thackeray : शिवसेनेतल्या फुटीरांची माझ्या दारात यायची हिंमत नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात आले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे. आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली.
या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री शरद पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. पण माझ्याकडे यायची कुणाची (शिंदे गट) हिंमत झाली नाही. बाळासाहेबांचे विचार चोरले वगैरे सगळं ढोंग होतं. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो वगैरे ते म्हणाले होते. मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे जशास तसं उत्तर देणारा, आरेला कारे करणारा मी आहे. त्यामुळे मी लढतोय. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे.
तसेच भाजपा शिवसैनिकांवर अन्याय करते म्हणून मी त्यांच्याबरोबर बसू शकत नाही असं म्हणून कल्याणला जाहीर सभेत राजीनामे देणारे हेच होते. मग तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? खिशात आम्ही राजीनामे घेऊन फिरतो. शिवसेनेतल्या फुटीरांची माझ्या दारात यायची हिंमतच नाहीये. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. शिवसेनेची, बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे. कुणी सांगितलं होतं तुम्हाला राजीनामे घेऊन फिरायला? का वेळ आली होती ती तुमच्यावर? ही सगळी तुमचीच वक्तव्य आहेत. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.

