निकालापूर्वी नार्वेकर - शिंदेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष उद्याही वेळकाढूपणा करतील. दीड वर्षापासून आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष दोनवेळा मुख्यमंत्री शिंदेंना भेटलं. आमच्या दृष्टीने मुख्यमंत्री शिंदे हे आरोपीच. विधानसभा अध्यक्षांकडून काय अपेक्षा ठेवायच्या?
आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारे लोक आहोत. जर नार्वेकर शिंदेंना भेटत असतील तर निर्णयाची काय अपेक्षा. नार्वेकर - शिंदे भेट म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटल्यासारखं. वेडावाकडा निकाल लागल्यास जनतेला सर्व माहिती असायला पाहिजे. सुनावणी सुरु असताना नार्वेकर शिंदेंना भेटलं. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे. प्रमाणे सुनावणी सुरू होती तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की वेळकाढूपणा करत आहेत. गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल द्यावा असं म्हटलं होतं. असे उद्धव ठाकरे म्हणाले.