Uddhav Thackeray : उद्धवसेनेचा नवा निर्धार! पाण्याच्या आंदोलनाची रूपरेषा होणार स्पष्ट
शिवसेनेच्या ठाकरे गटच्या वतीने शहरातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आज सायंकाळी 5 वाजता तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. पक्षातील अंतर्गत घडामोडींनंतर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवसेनेच्या आगामी पाण्याच्या आंदोलनाची रणनीती आणि संपूर्ण रूपरेषा यामध्ये सादर केली जाणार आहे. शहराला गेल्या काही वर्षांपासून भेडसावत असलेला पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेला पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुढाकार घेत आंदोलनाची तयारी सुरू केली असून, त्याची दिशा व धोरण आजच्या मेळाव्यात निश्चित केली जाणार आहे.
या मेळाव्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून हजेरी लावणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अलीकडील काही राजकीय उलथापालथींनंतर, पक्षातील एकात्मता, निष्ठावंत कार्यकर्त्यांची एकजूट आणि नव्या नेतृत्वाची ताकद दाखवण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे मानले जात आहे.
आज होणाऱ्या या मेळाव्यातून संभाजीनगरकरांच्या पाण्याच्या हक्कासाठी शिवसेना कोणती आंदोलनात्मक दिशा ठरवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जनतेचा खरा आवाज रस्त्यावर उतरतो का, याचा निर्णय आज ठरणार आहे.