LIVE छ. संभाजीनगरमध्ये मविआची सभा, उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
आम्ही भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही - उद्धव ठाकरे
नड्डा म्हणाले शिवसेनेला नामशेष करा. आधी तुम्ही शिवसेना पेलतेय का ते बघा. आम्ही भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही. मोठी केलेली माणसं गेलीत, पण त्यांना मोठं करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. आता महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ राज्यघटनेचं, भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आहेत. तुम्ही आम्हाला विचारताय याच्या थोबाडीत माराल का? आधी स्वत:च्या कानफटात मारून घे. आमचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाहीये. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवाय हे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे.
अशा लोकांनी गौरव यात्रा काढावी, हे शोभत नाही - उद्धव ठाकरे
एक इथला गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतो, हे तुमचं हिंदुत्व? तुमचा एक गद्दार सुषमा अंधारेंबद्दल खालच्या पातळीची टीका करतो. तुझ्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. आत्ता जर हे शिवसेनेत असते, तर त्यांची तसं बोलायची हिंमत नव्हती. त्यांना लाथ मारून गेटआऊट म्हटलं असतं. मतं पटत नसतील, तर मतांवर बोला. पण महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा लोकांनी गौरव यात्रा काढावी. हे शोभत नाही.
तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो- उद्धव ठाकरे
मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो त्यांना. हिंमत असेल, अगदी भाजपातही हिंमत असेल, तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो. होऊन जाऊ द्या. जेव्हा हवं तेव्हा वापर करुन घेतलात. काय काय चालली होती तुमची थेरं? उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा. पण आज माझ्याकडे काहीही नसताना काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष कठीण काळातही सोबत आहेत. काय तुम्ही माझं चोरणार? माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद माझ्यासमोर बसलेत. ते तर तुम्ही चोरू शकत नाही ना? तुम्हाला विचार दुसऱ्यांचे लागतात. सभेतही वाचू का, वाचू का विचारता. त्यांना मला सांगायचंय, की तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल, पण ही जनता जेव्हा मतदानाला उतरेल, तेव्हा तुम्ही वाचू शकणार नाही.
तेव्हा भाजपानं आपल्याला वापरून घेतलं...- उद्धव ठाकरे
जेव्हा हे महाराष्ट्रात अस्पृश्य होते, तेव्हा आम्ही त्यांना खांद्यावर घेतलं. नाहीतर यांना महाराष्ट्रात ओळखत कोण होतं? जेव्हा गरज होती तेव्हा भाजपानं आपल्याला वापरून घेतलं आणि माडीवर चढल्यावर आपल्याला लाथ मारतायत. त्याच तंगड्या धरून आपल्याला त्यांना खाली खेचायचंय आता. आज मी मुख्यमंत्री नाहीये. आपल्या पक्षाचं नाव, चिन्ह त्यांनी चोरलंय. एवढंच नाही, माझे वडीलही चोरायचा प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या वडिलांना किती वेदना होत असतील. काय दिवटं कार्टं, याला बापसुद्धा दुसर्याचा लागतो.
जे काम मी घरात राहून केलं, ते तुम्ही गुवाहाटी वगैरे वणवण फिरुनही करू शकला नाहीत- उद्धव ठाकरे
गंगापूरला अतिवृष्टी झाली होती. मला माहिती नाही, त्याचे पैसे मिळाले की नाही. आता अवकाळी झाली, गारपिटी झाली होती. पीकविम्यासंदर्भात आपण बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न करत होतो. तुंबळ योजना या सरकारनं जाहीर केल्या आहेत. पीकविम्यासाठी शेतकऱ्यांनी एकच रुपया द्यायचा म्हणे. काय दानशूर आहे सरकार. पण जेव्हा शेतकरी विम्याचे पैसे मागायला जातो. तेव्हा त्याच्या हातावर १० रुपयांचा चेक दिला जातो. पीकविमा योजना ऐकून आम्हाला लाज वाटायला लागली की काय बाबा राजा उदार झाला आहे. आपलं सरकार होतं, तेव्हा आपण हे का नाही केलं? पण आम्ही जे बोललो, ते आम्ही दिलं. मी घराबाहेर पडलोच नाही. पण जे काम मी घरात राहून केलं, ते तुम्ही गुवाहाटी वगैरे वणवण फिरुनही करू शकला नाहीत हे महाराष्ट्र बघतोय.
भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहात आहेत- उद्धव ठाकरे
जर वल्लभभाई नसते, तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही, हा प्रश्न आहे. त्यांनी मराठवाडा मोकळा केला. पण तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? वल्लभभाईंपासून काहीतरी घ्या ना. घुसवा फौजा पाकव्याप्त काश्मीरमध्ये. निवडणुका आल्या की लुटुपुटूचं काहीतरी करणार आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या. भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहात आहेत. न्यायवृंदामध्ये आपली माणसं घुसवायला मागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचं ऐकलंच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल.
सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय?
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीवरून वार करतो? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही घट्ट झालो आहोत. अमित शाहांनी पुण्यात म्हटलं की सत्तेसाठी मी तळवे चाटले. असं नाहीये की मी शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणार नाही. पण मी फक्त एवढंच म्हणालो, की आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय? नितीश कुमार आणि लालूंचं सरकार पाडून तुम्ही नितीश कुमारांचं काय चाटत होता? आता मोदी म्हणतायत की त्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम चाललंय. कोण करतंय? आम्ही करतोय का? आमची प्रतिमा नाहीये का? तुमचा कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणणार. आम्ही गप्प बसायचं. आम्ही काहीही बोललं तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना काहीही म्हटलं तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. आज देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जातोय.
जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही देशातल्या हिंदूंना आक्रोश करायला लागतोय- उद्धव ठाकरे
जातीय तेढ निर्माण झाली की समजा निवडणुका जवळ आल्या आहेत. सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख झाला. जरूर काढा, हल्ली महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश सुरू झाला आहे. मुंबईत काढला होता. कुठून काढला मला माहिती नाही, पण शिवसेना भवनापर्यंत आणला. मी म्हटलं याचा अर्थ एकच आहे. जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही देशातल्या हिंदूंना आक्रोश करायला लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे? मविआचं सरकार होतं. हिंदू, मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश कऱण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती.
आम्ही सोबत असताना जे भाजपाला जमलं नाही, ते मविआ सरकारनं करून दाखवलं- उद्धव ठाकरे
२५ वर्षं आपण वेगळ्या भ्रमात होतो. भाजपाबरोबर आपली युती होती. दोनदा सरकार आलं. पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं का? म्हणून मला अभिमान वाटतो, मविआच्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो, आम्ही सोबत असताना जे भाजपाला जमलं नाही, ते मविआ सरकारनं करून दाखवलं आहे. याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. करायचं काही नाही फक्त कोंबडे झुंजवत बसायचं. निवडणुका आल्यावर जातीय तेढ निर्माण करायची.
याच व्यासपीठावरून शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातलं होतं- उद्धव ठाकरे
ज्या ज्या वेळी मी या मैदानात आलो, तेव्हा कधीही गर्दीचा दुष्काळ मला दिसलाच नाहीये. उलट दिवसागणिक गर्दीचा महापूरच दिसतोय. याच शहरात 1988 साली महापालिका शहरवासीयांनी शिवसेनेच्या ताब्यात दिली. याच व्यासपीठावरून शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातलं होतं. तेव्हाच शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं की आजपासून या शहराचं नाव मी बदलून संभाजीनगर करतोय.
सावरकरांबद्दल तुम्हाला आदर-अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा - अजित पवार
यांना गौरवयात्रा काढायचं सुचतंय. तुमच्यात धमक असेल, खरंच सावरकरांबद्दल तुम्हाला आदर-अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. तुमच्यात आहे का हिंमत? फक्त महागाई, बेरोजगारीवरून दुसरीकडे लक्ष जाण्यासाठी हे चाललंय. संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडण्याचं काय कारण होतं? मविआची सभा होऊ नये म्हणून? ही कुठली लोकशाही? काहीजण फक्त वातावरण खराब करून महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज उद्योगपती राज्यात गुंतवणूक करायला तयार नाही. राज्यातलं वातावरण चांगलं राहिलं नाही, तर कुणीही इथे गुंतवणूक करायला येणार नाही.
यांचा पायगुण चांगला नाही - राज्य सरकारवर सडकून टीका
मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे नपुंसक सरकार आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? या पद्धतीने हे सरकार चालवतायत का? यांचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर सगळे उद्योग परराज्यात गेले. दोष द्यायचा कुणाला? ७५ हजार नोकऱ्या आणणार म्हणाले, पण कधी भरणार? तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालू आहे.
अनेक महापुरुषांची बदनामी झाली. तेव्हा यांची दातखिळ बसली होती का? - अजित पवार
यांच्या लोकांकडून अनेक महापुरुषांची बदनामी झाली. तेव्हा यांची दातखिळ बसली होती का? मध्ये सावरकरांबाबत काहीतरी बोललं गेलं. पण वडिलकीच्या नात्याने समजावून सांगितल्यानंतर ते वातावरण निवळलं. इथे गौरवयात्रा काढायला आमचा विरोध नाही. पण तुम्ही दुटप्पी राजकारण करता. छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला, पण त्यांचा अपमान झाला तेव्हा तुम्हाला राज्यपालांना थांबवता आलं नाही. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही. मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे नपुंसक सरकार आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? या पद्धतीने हे सरकार चालवतायत का?
आयोग जर असे निर्णय द्यायला लागलं, तर कसं होणार? अजित पवारांचा सवाल
आम्ही अनेक वर्षं राज्यकर्ते, विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. पण अशा प्रकारे कुठला निकाल दिलेला आमच्यातरी ऐकिवात नाहीये. कायद्याचा, संविधानाचा आदर करण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. पण याला तिलांजली देण्याचं काम झालं. ज्या प्रकारे महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, तसं घडत राहिलं, तर देशात स्थिरता राहणार नाही. ती देशाला परवडणार नाही. एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याला मान्यता दिली. आयोग जर असे निर्णय द्यायला लागलं, तर कसं होणार? न्यायदेवतेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे. न्यायदेवता न्याय देईल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
मविआ येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सगळे जीवाचं रान करतील - अजित पवार
सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मविआचं सरकार सत्तेत आलं. आपला उद्देश तळापर्यंत पोहोचवण्यासाठी सभा घेऊ. पण तेव्हा करोनाचा काळ असल्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही. नंतर काही राजकीय घटना घडल्या आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं मविआ सरकार पायउतार झालं. मविआ येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सगळे जीवाचं रान करतील. सगळे कार्यकर्ते मविआचा कणा या नात्याने लढतील.
एवढा भला माणूस मी पाहिला नाही,चव्हाण यांच्याकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक
एवढा भला माणूस मी पाहिला नाही. मनाचा मोठा, काम करताना पूर्ण मोकळीक. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न, निर्णय घेताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत कधी वेगळी भूमिका घेतली नाही. करोनाच्या काळातही त्यांची भूमिका सकारात्मक होती.
सत्ताधाऱ्यांनी आमदारांची फोडाफोडी केली - अशोक चव्हाण
गेलेत ते कावळे, राहिले ते मावळे - अशोक चव्हाण
जो कुणी विरोधात बोलेल, त्याच्याघरी ईडी जाऊन पोहोचते - थोरात
शरद पवारांचं मार्गदर्शन लाभलं आणि मविआ अस्तित्वात आली - बाळासाहेब थोरात
उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी पुढाकार घेतला. सोनिया गांधींनी त्याला पाठिंबा दिला. शरद पवारांचं त्याला मार्गदर्शन लाभलं आणि महाविकासआघाडी अस्तित्वात आली. आम्ही अडीच वर्षांचा एक ऐतिहासिक कालखंड काम केलं. आधी आम्ही सात मंत्री होतो. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आमची बैठक घेतली. आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं.
MVA Rally: जनतेला खऱ्या अर्थानं कुणी फुल बनवलं असेल, तर ते कमळाच्या फुलानं - धनंजय मुंडे
आजच्या सभेला सुरुवात कुठून करावी? काल १ एप्रिल झाला. चार दिवसांनंतर ६ एप्रिल आहे. त्या दिवशी भाजपाचा स्थापना दिवस आहे. पण गेल्या १० वर्षांचं देशातलं राजकारण पाहिलं, तर २०१४ पासून ज्या निवडणुका झाल्या, जनतेला खऱ्या अर्थानं कुणी फुल बनवलं असेल, तर ते कमळाच्या फुलानं बनवलंय.
मविआच्या वज्रमुठ सभेला गर्दी जमायला सुरुवात
मविआची आज छ. संभाजीनगरमध्ये सभा पार पडत आहे. ज्याठिकाणी ही सभा पार पडणार त्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आता गर्दी जमायला सुरूवात झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभा आणि भाजपची आणि शिवसेनेची सावरकर गौरव यात्रा
छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेसाठी आणि भाजपच्या सावरकर गौरव यात्रेसाठी पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. सोबतच सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा द्वारे सुद्धा या दोन्ही कार्यक्रमांवर नजर ठेवणार आहे.