विनायक मेटेंना तासभर मदत मिळाली नाही; ड्रायव्हरचा गंभीर आरोप

विनायक मेटेंना तासभर मदत मिळाली नाही; ड्रायव्हरचा गंभीर आरोप

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.
Published on

रायगड - शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती, असे धक्कादायक वास्तव त्यांच्या ड्रायव्हरने सांगितले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताना भातान बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या गाडीचा ताबा सुटल्याने दुसऱ्या वाहनावर आदळली. या अपघातात मेटे यांना गंभीर मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर, मेटे यांच्या ड्रायव्हरला आणि गार्डला मुकामार लागला आहे.

गाडीत एअरबॅग असल्याने आम्ही थोडक्यात बचावलो असल्याचे ड्रायव्हरने सांगितले. तसेच, एक तास होऊनही आम्हाला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्याने केला आहे. गाड्या थांबवण्याचे आम्ही अनेक प्रयत्न केले. परंतु, कोणीही गाडी थांबवली नाही. नंतर छोटा टेम्पो चालकाच्या मदतीने दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे ड्रायव्हरने सांगितले.

विनायक मेटे कोण होते?

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य राहिले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com