Maharashtra Elections: मोठी बातमी! निवडणूक निकालानंतर राजकारणात भूकंप, अजित पवारांना जबर धक्का
गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली आणि राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीने विजयाचा गुलाल उधळला असून, महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे.
महायुतीचे तब्बल 214 नगराध्यक्ष उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, त्याचे 117 उमेदवार यशस्वी झाले. शिंदे गटाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली ज्याचे 57 उमेदवार विजयी झाले, तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर असून तिचे 37 उमेदवार निवडून आले.
या निवडणुकीत अजित पवार गटाला मित्रपक्ष शिंदे शिवसेनेकडूनच मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या पत्नी इंदुमती भगत, युवक जिल्हाध्यक्ष धीरज कोळी आणि युवक कार्याध्यक्ष संजय कांबळे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर ठाकरे गटातील काही पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीला हा अप्रत्यक्ष झटका दिला असून, नवी मुंबईत राजकीय भूकंप उसळला आहे.
दरम्यान, राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असून, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर पक्षांतरांना वेग आला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून, महाविकास आघाडीमधील अनेक उमेदवार महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे वळत आहेत. शिंदे शिवसेनेतही पक्षप्रवेश सुरू आहेत. या निकालांनी महायुतीला आत्मविश्वास मिळाला असून, येत्या महापालिका लढतीत ती मजबूत स्थितीत आहे.
