Maharashtra
Maharashtra

Maharashtra : महाराष्ट्र सरकार आणि ब्लॅकस्टोन समुहामध्ये सामंजस्य करार; 27 हजार 510 रोजगाराच्या संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स व होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Maharashtra ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स व होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. सह्याद्री अतिथीगृहात हा करार उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बळगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांच्या हस्ते स्वाक्षरीत करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके यांच्यासह ब्लॅकस्टोन ॲडव्हायझर्सचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन, तसेच एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे आशीष अग्रवाल उपस्थित होते.

या करारामार्फत महाराष्ट्रातील विविध औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक झोनमध्ये सुसज्ज लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्स विकसित केले जाणार आहेत. नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर आणि पनवेल या प्रमुख ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. एकूण 794.2 एकर क्षेत्रफळावर हे प्रकल्प राबविले जातील, ज्यामध्ये सुमारे 1.85कोटी चौ. फूट बांधकाम केले जाणार आहे.

या उपक्रमात सुमारे ₹5,127 कोटी इतकी थेट परकीय गुंतवणूक अपेक्षित असून, या प्रकल्पांमधून थेट व अप्रत्यक्ष मिळून जवळपास 27,510 रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक, डिजिटल सुविधांनी युक्त आणि सामाजिक व शासकीय जबाबदाऱ्यांशी सुसंगत असतील. हे महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024च्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागीदारीबाबत आशावाद व्यक्त करताना सांगितले की, या प्रकल्पांमुळे राज्यात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक व औद्योगिक हब्स उभे राहतील. हे प्रकल्प उत्पादन, वेअरहाउसिंग आणि पुरवठा साखळीमध्ये भारताची स्पर्धात्मकता वाढवतील आणि महाराष्ट्राला लॉजिस्टिक्स क्षेत्रात आघाडीवर नेतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com