Maharashtra
Maharashtra

Maharashtra : राज्यात 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक; 25 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात तब्बल 10 सामंजस्य करार (MoUs) आणि दोन रणनीतिक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Maharashtra) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात तब्बल 10 सामंजस्य करार (MoUs) आणि दोन रणनीतिक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांमुळे राज्यात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 25,892 पेक्षा अधिक नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र "डेटा सेंटर कॅपिटल" आणि "सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल" म्हणून उदयास येत आहे. यूकेसोबतच्या रणनीतिक करारामुळे परदेशी गुंतवणूकदारांचे आकर्षण आणखी वाढले असून, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतिक आहे. राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांसोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या करारांमध्ये सौरऊर्जा, डेटा सेंटर, पोलाद उद्योग, औद्योगिक उपकरणे आणि हरित उर्जा यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. ज्युपिटर इंटरनॅशनल लि. कंपनीने सोलर पॅनेल निर्मितीसाठी तब्बल 10,900 कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले असून यातून 8,308 रोजगार निर्माण होणार आहेत. रोचक सिस्टिम्स (2,508 कोटी), रोव्हिसन टेक हब (2,564 कोटी) आणि वेबमिंट डिजिटल (4,846 कोटी) यांनी डेटा सेंटर प्रकल्पांसाठी करार केले आहेत.

तसेच, वॉव आयर्न अॅण्ड स्टिल (4,300 कोटी), अॅटलास्ट कॉपको (575 कोटी), एलएनके ग्रीन एनर्जी (4,700 कोटी) आणि प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्स (12,500 कोटी) यांच्याकडून हजारोंच्या संख्येने रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय, ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉर आणि युके-युरोप गुंतवणुकीसाठी विशेष करार तर टीयूटीआर हायपरलूप कंपनीसोबत जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प उभारण्यासंबंधी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. हायपरलूपसारखा नावीन्यपूर्ण प्रकल्प लॉजिस्टिक आणि मोबिलिटी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com