Maharashtra Rain : राज्यात 21 ते 26 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता
(Maharashtra Rain) राज्यात आज 21 जुलै रोजी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील तब्बल 31 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता असून पालघरमध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मुंबई, रायगड येथे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मुसळधार सरी कोसळू शकतात.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक असू शकतो. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांमध्ये विजा आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर,धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहेत.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.