Bakri Eid : बकरी ईदनिमित्त वारिस पठाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; तोंड भरून कौतुक केलं आणि...
सध्या राज्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि धार्मिक वातावरण तापले असताना, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी आमदार वारीस पठाण यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुस्लिम समाजाच्या काही महत्त्वाच्या मागण्यांविषयी निवेदन सादर केले.
या बैठकीत वारीस पठाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत कायदासुव्यवस्था, मस्जिद परिसर स्वच्छता, देवनार बकरी बाजार, तसेच लाऊडस्पीकरविषयी असलेले गैरसमज यावर सविस्तर चर्चा केली. याशिवाय काही संघटनांनी बकरी ईदपूर्वी तीन जून ते आठ जून दरम्यान बकऱ्याच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती, यावरही पठाण यांनी आपली भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत संबंधित बंदी मागे घेतली असल्याचे सांगितले व मुस्लिम बांधव बकरी ईद शांततेत साजरी करू शकतील अशी ग्वाही दिली. त्यांनी स्पष्ट केले की, "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. सर्व धर्मीयांना आपले सण साजरे करण्याचा अधिकार आहे. सरकार सर्व समाजासोबत आहे."
वकील संघटनांनी मुंबईच्या DIG यांना जसप्रीत यशवंत वर्मा यांच्या विरोधात दिलेल्या निवेदना विषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पठाण म्हणाले की, "मी वकील असून कायद्याच्या चौकटीत जो काही निर्णय घेतला जाईल त्याला माझा पाठिंबा असेल. कायद्यापुढे कोणीही मोठे नाही."
राहुल गांधी यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकेवर प्रतिक्रिया देताना वारिस पठाण म्हणाले की, "मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने बोलणार नाही. जेव्हा देशावर संकट येते तेव्हा सर्वपक्षीय एकात्मता आवश्यक असते. पहलगाम, पुलवामा किंवा 26/11 हल्ल्याच्या वेळेस सर्वपक्षीय भूमिका होती आणि शत्रूराष्ट्र घाबरले होते. हीच भूमिका आजही असावी."