Mumbai : मालकाचा विश्वास संपादन करत कामवालीने केली मालकाच्याच घरात चोरी...
डोंबिवली : मालकाचा विश्वास संपादन करत मोलकरणीने मालकाच्या मुलीच्या घरातील तब्बल साडे बारा तोळे सोने चोरल्याची घटना घडली आहे. सदर घटना डोंबिवली पूर्व सागरली परिसरात घडली असून या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर टिळक नगर पोलीसानी कल्पना सुर्वे या महिलेला अटक केली आहे त्यासोबतच तिच्याकडून 96 हजारांचे सोने हस्तगत केलं आहे.
डोंबिवली जीमखाना रोडला असलेल्या सांगर्लीतील तारांगण सोसायटीत स्वाती आपटे या शिक्षिका राहतात. त्यांच्या वडिलांच्या घरी कल्पना सुर्वे ही महिला घरकाम करायची. कल्पनाने आपटे यांचा विश्वास संपादन करत त्यांच्या घरी साफ सफाईचे काम करणे सुरू केले होते. सफाई काम करता करता कल्पनाने त्यांच्या घरातील तब्बल साडे बारा तोळे सोने लंपास केले.
घरातील सोने चोरीला गेल्याचे लक्षात येताच याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलीसानी तपास करत कल्पना सुर्वे हिला बेड्या ठोकल्या आहेत. तिच्याजवळून आतापर्यंत 96 हजारांचे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.