Chandrashekhar Bawankule : 'आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी'
(Chandrashekhar Bawankule) मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तब्बल 17 वर्षांनंतर आज निकाल लागला. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये रमजानच्या महिन्यात मशिदीजवळ झालेल्या स्फोटाने शहर हादरले होते. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक नागरिक जखमी झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं. या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला.आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी! हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे.' असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.