Malegaon Bomb Blast
Malegaon Bomb Blast

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; 17 वर्षांनी न्याय मिळणार का?

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तब्बल 17 वर्षांनंतर आज निकाल लागणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Malegaon Bomb Blast) मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तब्बल 17 वर्षांनंतर आज निकाल लागणार आहे. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. लाहोटी हे आज, गुरुवारी सकाळी 11 वाजता बहुचर्चित खटल्याचा निर्णय जाहीर करणार आहेत. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये रमजानच्या महिन्यात मशिदीजवळ झालेल्या स्फोटाने शहर हादरले होते. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

हमीदा रोड परिसरात एका एलएमएल फ्रीडम मोटारसायकलमध्ये लपवून ठेवलेले स्फोटके अचानक फुटले. त्या वेळी लोक मशिदीतून नमाज आटोपून बाहेर पडत होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र ATS ने केला. त्यानंतर 2011 मध्ये तपास NIAकडे गेला. विविध न्यायालयांत आरोपींकडून दाखल झालेले अर्ज, तपासातील त्रुटी, आणि न्यायालयीन प्रक्रियेमधील विलंबामुळे हा खटला तब्बल 17 वर्षे प्रलंबित राहिला.2018 मध्ये NIA न्यायालयाने सात आरोपींविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले.

मालेगाव स्फोट प्रकरणी भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित आयपीसीची कलमं, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवाद विरोधी कायदा आणि युएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला. तर, श्याम साहु, प्रवीण कल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे हे आरोपी फरार होते.निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन SRPF तुकड्या, 10 वरिष्ठ अधिकारी आणि 100हून अधिक कर्मचारी तैनात आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com