Solapur : मंगळवेढा हादरलं! सिलेंडरच्या स्फोटात दोन चिमुकल्यांचा मृत्यू, चौघे जखमी
(Solapur ) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर-झरेवाडी परिसरात 25 जून रोजी दुपारी घडलेल्या घरगुती गॅस स्फोटाच्या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला. गंगथडे कुटुंब शेव बनवत असताना गॅस रेग्युलेटर काढताना अचानक भडका उडाला आणि पाइपमधून झालेल्या गॅस लिकेजमुळे भयानक स्फोट झाला. या दुर्घटनेत श्रेया (वय 1 वर्ष) आणि स्वरा (वय 2 वर्ष) या दोन चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
या स्फोटात दादासाहेब गंगथडे, मोनाली गंगथडे, अनुजा गंगथडे आणि सुनीता गंगथडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंगथडे कुटुंब शिरसी येथे हॉटेल व्यवसाय करतात. शेव तयार करत असताना ही जीवघेणी दुर्घटना घडली.
दुर्घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, बीटचे पोलीस हवालदार कोष्टी आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलवले. चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे गंगथडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.