Marathawada Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
(Marathawada Rain ) मराठवाड्यात पावसाचा कहर अद्याप सुरूच आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे शेकडो जनावरे दगावली आहेत. नांदेड जिल्ह्यातील वरवट येथे ढगफुटीसदृश पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि दोन मुलींसह त्यांची आई वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, मंगळवारी सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिव जिल्ह्यात 230.9 मिमी झाली असून, लातूर जिल्हा 206.5 मिमी पावसासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. धाराशिव जिल्ह्यातील 42 महसूल मंडळांपैकी तब्बल 19 मंडळांत अतिवृष्टी झाली.
बीड जिल्ह्यात सोमवारी रात्रीच्या पावसाने सहा महसूल मंडळांना फटका बसला आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असून, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे मशागतीची कामे अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 ते 31 मेदरम्यान मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.