बंदुकीच्या फैरी झाडत ‘अमर रहे’च्या घोषणा, शहीद जवान विशाल पवार यांना अखेरचा निरोप

बंदुकीच्या फैरी झाडत ‘अमर रहे’च्या घोषणा, शहीद जवान विशाल पवार यांना अखेरचा निरोप

Published by :
Published on

प्रशांत जगताप, सातारा | जम्मू काश्मिर येथील पूंछ (राजौरी) या ठिकाणी 16 मराठा लाईट इनफंट्री येथे हवालदार म्हणून देश सेवा बजावत असलेले 32 वर्षीय जवान विशाल विश्वास पवार यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी बंदुकीच्या फैरी झाडत "अमर रहे"च्या घोषात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

14 वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.त्यांनी आसाम, ग्वालियर,जम्मू काश्मीर (राजुरी) या ठिकाणी देशसेवा केली.जम्मू काश्मिर येथील पूंछ (राजौरी) या ठिकाणी 16 मराठा लाईट इनफंट्री येथे हवालदार म्हणून देश सेवा बजावत होते. एक वर्षापूर्वी त्यांना सेवा बजावत असताना श्र्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उदमपूर येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलला हलविण्यात आले. 3 महिन्यापासून त्यांच्यावर पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी साडेचार वाजता त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

गावाकडे सुट्टीवर असताना ते मनमिळावू स्वभावामुळे ग्रामस्थांच्या परिचित होते त्यांचे मूळ गाव गुजरवाडी हे आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे कुटुंबीय वाठार स्टेशन येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलांनी सातारा पोलीस दलात सेवा बजावली होती. निधनाची बातमी कळताच वाठार स्टेशन पंचक्रोशीवर दुखा:चे सावट पसरले. आज सकाळपासून वाठार येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ संपूर्णपणे बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी शहीद जवान विशाल पवार यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीमधून अंतयात्रा काढण्यात आली.यावेळी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करून आदरांजली वाहिली. सातारा पोलीस दलाच्या वतीने त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली.यावेळी आमदार महेश शिंदे, आ. दिपक चव्हाण, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सरपंच नीता माने, लष्कराचे अधिकारी, जवान, पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com