Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच वर्षा निवासस्थानी तब्बल दीड तास खलबतं
(Maratha Reservation) मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मोठा मोर्चा मुंबईत दाखल होणार असल्याची घोषणा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. आंदोलन सुरु होण्यापूर्वी सरकारकडून हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर विविध बैठका सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर सुमारे दीड तास मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात असून, 29 ऑगस्टच्या मोर्च्यापूर्वीच सरकारकडून काही महत्वाची घोषणा होऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी विशेष रणनीती आखली गेल्याचे देखील बोललं जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असल्याने मुंबईत या मोर्च्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलन होण्यापूर्वीच सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.