Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड
(Nitesh Rane) पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बाजारपेठेत सुरू असलेल्या एका मटका बुकी सेंटरवर धाड टाकली. काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास नितेश राणे यांनी धाड टाकली असून त्याठिकाणी काही लोकांसह पैसे आणि चिठ्ठ्या पाहायला मिळाल्या. यासोबतच काहीजण पैशांचा हिशोब करताना दिसून आले.
नितेश राणे यांनी टाकलेल्या धाडीमुळे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या प्रकारानंतर पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन घटनास्थळी बोलवण्यात आले. धाड टाकल्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षकांना धाड टाकल्याचे कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
यावेळी नितेश राणे यांनी कणकवली पोलिस निरिक्षकांसह जिल्हा पोलिस अधिक्षकांना खडेबोल सुनावले. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात मटका जुगारासह अवैध धंदे चालू देणार नाही असा इशारा दिला. यावेळी पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेत सुमारे तीन लाखांची रोकड जप्त केली.