Amit Thackeray
Amit Thackeray

Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; पत्रात काय?

मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Amit Thackeray) मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अमित ठाकरेंनी म्हटले आहे की, "गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये जे घडलं, ते आजही आमच्यासाठी अविश्वसनीय आहे. आमचा सहकारी बाळासाहेब सरवदे याला ज्या क्रूर पद्धतीने संपवण्यात आले, ते आजही विश्वास बसण्यापलीकडे आहे. राजकारण या थराला जाऊ शकते, याचा कधी विचारही केला जाऊ शकत नाही. मी सोलापूरला जाऊन बाळासाहेबांच्या कुटुंबाला भेटलो. तिथे जे पाहिलं आणि जे ऐकलं, त्यानंतर मला आपल्याशी तातडीने प्रत्यक्ष बोलायचं होतं.

मी आपल्या भेटीसाठी वेळ मागण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपली भेट होऊ शकली नाही, याची खंत आहे. त्या घरात गेल्यानंतर बाळासाहेबांच्या दोन लहान मुलींचा आक्रोश ऐकून मन स्तब्ध झाले. त्या चिमुकल्यांना तर अजून हेही माहीत नाही की त्यांचे बाबा आता कधीच परत येणार नाहीत. कालच त्या मुलींनी आपल्या हातांनी वडिलांचे 'अस्थी विसर्जन' केले, या प्रसंगाचा विचारही करवत नाही, त्यांची आई, आणि त्यांची बायको.... यांच्या समोर काय बोलावं हेच सुचत नव्हतं."

"निवडणुका तर होत राहतील, पण सत्तेसाठी कोणाचं घर असे उद्धवस्त व्हावं? ही कोणती संस्कृती जपतोय आपण? हा कोणता महाराष्ट्र घडवतो आहे आपण? मला राजकारण करायचं नाही, पण एक माणूस म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आणि आग्रहाची मागणी आहे की १. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी : बाळासाहेबांच्या दोन्ही मुलींच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी. या हत्येमुळे एका घराचा आधार हरपला आहे, तो आधार पुन्हा मिळवून देणे ही राज्याचे प्रमुख म्हणून आपली जबाबदारी आहे. २. कठोरातील कठोर कारवाई : ज्यांनी हे क्रूर कृत्य केलंय, त्यांना इतकी कडक शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची अशी हिम्मत होणार नाही. ही केवळ कायदेशीर कारवाई नसावी, तर तो त्या कुटुंबासाठी एक 'न्याय' असावा."

"निवडणूक नियमावलीत बदल : प्रचाराच्या नावाखाली असे जीव जाणं आता थांबले पाहिजे. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या प्रचार आणि राजकीय वादाचे रूपांतर अशा हिंसक घटनांमध्ये होऊ नये, यासाठी निवडणूक आचारसंहितेमध्ये कडक नियमांची अंमलबजावणी करावी, जेणेकरून उद्या पुन्हा कोणती आई किंवा पत्नी अशी उघडयावर पडणार नाही.. सत्ता मिळवण्यासाठी कुणाचे घर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, गृहमंत्रीही आहात. ही लढाई सत्तेची किंवा राजकारणाची नाही, ही लढाई 'न्यायाची' आहे. राजकारण कितीही खालच्या थराला गेले तरी आपण आपली संस्कृती विसरता कामा नये. निवडणुका येत राहतील, जात राहतील; पण गेलेला माणूस पुन्हा परत येणार नाही. मला खात्री आहे की, आपण आपला वेळ काढून या कुटुंबाला नक्की भेट घ्याल आणि त्या चिमुकल्या मुलींना न्यायाची खात्री द्याल." असे अमित ठाकरे म्हणाले.

Summary

  • सोलापूरमधील मनसेचा पदाधिकारी सरवदेची हत्या प्रकरण

  • अमित ठाकरे यांचे फडणवीस यांना पत्र

  • आरोपीला कठोर शिक्षा व्हावी-अमित ठाकरे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com