Ganeshotsav ST Bus : बाप्पा येण्याआधी त्यांचा आशिर्वाद! पालघरहून गणेशोत्सवासाठी 400 हून अधिक एसटी गाड्या सुटणार
कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, चाकरमान्यांची गावाकडे धाव सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाकडून मोठ्या प्रमाणात एसटी फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ४२४ एसटी बसेस १८ ठिकाणांसाठी धावणार असून, प्रवाशांना भाड्यात सूट देण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात आणि इतर भागात राहणारे हजारो नागरिक आपल्या गावी परततात. गावच्या कुटुंबियांसोबत सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी, तसेच गावची संस्कृती, परंपरा आणि नातेगोते जपण्यासाठी अनेकजण लांबचा प्रवास करतात. या प्रवासासाठी एसटी सेवेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, बुकिंग जोरात सुरू आहे.
गुहागर सर्वाधिक लोकप्रिय
या वर्षी गुहागरकडे जाण्यासाठी सर्वाधिक १९३ बसांचे बुकिंग झाले आहे. त्यानंतर राजापूरसाठी ३७, श्रीवर्धनसाठी ३५, मंडणगडसाठी ३३ आणि चिपळूणसाठी २७ गाड्या नोंदवल्या गेल्या आहेत. एकूण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३४६, रायगडसाठी ६९, सिंधुदुर्गसाठी ७ आणि कोल्हापूरसाठी २ बसेस धावणार आहेत.
भाड्यात सूट आणि विशेष सुविधा
महिलांना बस प्रवासावर ५० टक्के, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. याव्यतिरिक्त, यंदा एसटी महामंडळाने ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या सर्व प्रवाशांना १५ टक्के भाड्यात सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बुकिंगची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
रक्षाबंधनाचा विक्रमी प्रतिसाद
याआधी रक्षाबंधनाच्या तिन्ही दिवस सलग सुट्यांमध्ये पालघर विभागाने ३ लाख ५२ हजार किमीचे बस फेरे चालवले होते. यात ३ लाख ३२ हजार प्रवाशांनी प्रवास केला आणि विभागाला तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हा अनुभव लक्षात घेता, गणेशोत्सव काळातही प्रवाशांचा मोठा ओघ राहील, असा विश्वास पालघर विभागाला आहे.
बुकिंगची शेवटची तारीख
गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी २० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष बुकिंग करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, “सणासुदीच्या काळात प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वेळेत व्हावा यासाठी आम्ही अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांनी आगाऊ बुकिंग करून प्रवासाचा आनंद घ्यावा.”