‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
१९४२च्या चले जाव चळवळ, गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार, स्वातंत्र्यसेनानी कृष्णराव साबळे अर्थात शाहीर साबळे यांचं जन्मशताब्दी वर्ष पुढच्या वर्षी ३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत आहे. या जन्मशताब्दी वर्षात शाहिरांना अभिवादन करण्यासह त्यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' या मोठ्या पडद्यावर येणाऱ्या चित्रपटातून घेतला जाणार आहे.
आता शाहीर साबळे यांंच्या ३ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जीवनकार्याचा वेध 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. अनेक नाटकं, टीव्ही मालिका केलेल्या ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचं लेखन करत आहेत. तर शाहिरांचेच नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. नातवानंच आपल्या आजोबांवर चित्रपट करण्याचा दुर्मीळ योग या चित्रपटामुळे जुळून येणार आहे. चित्रपटात शाहिरांची आणि त्यांच्या समकालीन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार अशा प्रश्नांची उत्तरं टप्प्याटप्प्यानं दिली जातील. जन्मशताब्दी वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
शाहीर साबळे यांचा संपूर्ण जीवनपट लोकांसमोर आणणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. आजवर मी अनेक चित्रपट केलेले असले, तरी 'महाराष्ट्र शाहीर' हा माझ्यासाठी फारच जास्त महत्त्वाचा चित्रपट आहे. माझ्यातील कौशल्य पणाला लावून मी हा चित्रपट प्रेक्षकांपुढे आणणार आहे. पुढच्या कित्येक पिढ्या माझ्या आजोबांना लक्षात ठेवतील असा चित्रपट करणार आहे. जन्मशताब्दी वर्षात येणारा हा चित्रपट एक माणूस म्हणून, कलावंत म्हणून आणि नातू म्हणून शाहीर साबळे यांना मानाचा मुजरा असेल.