“दाखवून देऊ… किसमे कितना है दम” काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा
राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत दंड थोपटले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याआधी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही पुढील स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वत:च्या बळावर रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आम्हाला तिसरा पक्ष म्हणतात, अशी खंत व्यक्त करत, आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम, अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटलं जातंय अशी खंत भाई जगतापांनी व्यक्त केली. येत्या निवडणुका या आम्हाला स्वबळावर लढू द्याव्यात अशी मागणी त्यांनी प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे केलीय.
महाराष्ट्राच्या प्रभारींनी हा संदेश सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे पोहोचवावा, अशी विनंतीही त्यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता भाई जगतापांनीही स्वबळाचा नारा दिलाय.

