Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेवर 18 तासांचा ‘जम्बो ब्लॉक’
मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज मध्य रेल्वेवरवर तब्बल 18 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून ते मध्यरात्री दोनपर्यंत ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
या ब्लॉकसाठी लोकलच्या 160 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन्सही आज रद्द करण्यात आल्या आहेत.
रविवारी मध्य रेल्वेवर सकाळी 8 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याआधी शुक्रवारी मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या पाहणी आणि मंजुरीनंतर हा मेगाब्लॉक घेतला जात आहे. ब्लॉकमुळे कमी लोकल आज धावणार आहेत.
ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी शुक्रवारी या मार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गाच्या कामासाठी आज (रविवारी) 18 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचं निश्चित करण्यात आलं.