मुंबई लोकल मार्गावर आज मेगाब्लॉक नाही,महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेकडून विशेष सोय
मुंबईकरांना आज रविवारी दिलासा मिळाला आहे. मुंबई लोकल रेल्वे मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक असणार नाही. विशेष म्हणजे उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. आज मध्य रेल्वे, मुंबई विभाग मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विभाग आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल या दोन्ही उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्या
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे.कोरोनासंबंधित नियमांचं पालन करुन चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांकरीता 8 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि उतरताना कोविड-19 नियमांचे पालन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.