मुंबई पोलिसांनी फार्मा कंपनीच्या मालकाला घेतले ताब्यात , देवेंद्र फडणवीस यांची पोलीस स्थानकात एण्ट्री

मुंबई पोलिसांनी फार्मा कंपनीच्या मालकाला घेतले ताब्यात , देवेंद्र फडणवीस यांची पोलीस स्थानकात एण्ट्री

Published by :

राज्यात कोरोना रूग्ण वाढत असतानाच रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. या संदर्भात दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती. या पार्श्वभूमीवर ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. या दोन्ही नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर डोकनिया यांना पोलिसांकडून रात्री उशिरा सोडण्यात आलं आहे.

पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. 'महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी 10 पोलीस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com