नगरपरिषद कर्मचार्याची आत्महत्या; शिवसेना महिला उपशहर प्रमुखांविरोधात गुन्हा
संजय राठोड | यवतमाळमध्ये महिलेकडून वारंवार धमकी मिळत असल्या कारणाने त्रासाला कंटाळून नगर परिषद कर्मचार्याने व्हीडीओ बनवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. अनिल उबाळे, असे मृत नगर परिषद कर्मचार्याचे नाव आहे. या घटनेने दिग्रससह यवतमाळ जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृताची पत्नी रमा उबाळे हिच्या तक्रारीवरून अर्चना अरविंद राठोड या महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिग्रस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
अनिल उबाळे यांना अर्चना राठोड ही महिला पैशासाठी मानसिक व शारीरिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून अखेर अनिल याने आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी दिग्रस पोलिस ठाण्यात धडक देत आरोपी महिलेला अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. अनिल याने आपण आत्महत्या करीत असल्याची माहिती काकूला फोनवर दिली. त्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.
सदर आरोपी महिला ही शिवसेना पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. परंतु शिवसेना महिला आघाडीच्या संयोजिका संजीवनी शेरे यांनी त्या महिलेचा पक्षाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे स्पष्ट केले. परंतु, पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत सदर महिला शिवसेना पक्षाची उपशहर प्रमुख असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मी पुसदला असताना अनिलचा फोन आला होता. आत्महत्या करीत असल्याचे त्याने मला सांगितले. त्याची समजूत काढून शांत राहण्याचा सल्ला दिला होता. महिला खूप त्रास देत आहे. आता सहन होत नाही, माझ्या मरणानंतर न्याय मिळवून देण्याची मागणी अनिलने केली होती, असे मृताची काकू शिल्पा खंडारे यांनी सांगितले.

