नागपूरमध्ये उद्या १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला- मुलींचे लसीकरण, १४ स्थायी केंद्रांसह ३३ शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यवस्था

नागपूरमध्ये उद्या १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला- मुलींचे लसीकरण, १४ स्थायी केंद्रांसह ३३ शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यवस्था

Published by :

कल्पना नळसकर, नागपूर | नागपूर शहरातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आला आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे शहरात १४ स्थायी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. याशिवाय मनपाकडे आलेल्या विनंतीवरुन शहरातील ३३ शाळा आणि महावि‌द्यालयांमध्ये लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर शहरात १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), एम्स, मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, एम्समधील आयुष इमारत, प्रगती सभागृह, दिघोरी, आयसोलेशन हॉस्पिटल, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कामठी रोड, सच्चिदानंद नगर उद्यान, स्व. प्रकारराव दटके महाल रोगनिदान केंद्र, दीक्षाभूमी, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचपावली सूतिकागृह आणि मध्य रेल्वे रुग्णालय हे १४ स्थायी केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवर सोमवार ३ जानेवारी २०२२ पासून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कोव्हिड प्रतिबंधात्मक लस दिली जाईल. या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सीन लस देण्यात येईल. त्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल. ३१ डिसेंबर २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. लस घेतल्यानंतर मुलांची देखरेख करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध राहतील आणि त्यांना अर्ध्या तासाने घरी सोडले जाईल.

लसीकरणासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी अनिवार्य असून शैक्षणिक संस्थांमधील केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीची गरज नाही. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाताना स्वत:चे आधार कार्ड आणि मोबाईल सोबत बाळगणे आवश्यक आहे. १८ वर्षावरील वयोगटाचे लसीकरण नियमित सुरूच राहणार आहे. लसीकरणासाठी पात्र नागपूर शहरातील सर्वांनीच सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा आणि आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

सोमवारी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ३३ शैक्षणिक संस्थांनी लसीकरण केंद्रासाठी मनपाकडे विनंती केली. त्यानुसार या केंद्रांवर मनपाद्वारे लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकांच्या संमतीनेच मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देऊन सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com