Nashik : नाशिकमध्ये कृत्रिम तलावात पोहायला गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
(Nashik) नाशिक शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकमधील बिडी कामगार परिसरात कृत्रिम तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक शहरात बिडी कामगार परिसरात बांधकामाचे काम चालू होते. या कामासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. जवळच्या परिसरातील तीन अल्पवयीन मुलांनी रविवारी दुपारी त्या तलावात पोहण्याचा प्लॅन बनवला. या प्लॅननुसार ती मुले त्या कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेली. मात्र त्यांच्या घरच्यांना याबाबतीत काहीच माहिती नव्हती. दुपारपासून मुले घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. मात्र रात्रीपर्यंत मुलांचा काहीच पत्ता लागला नाही.
अखेर सकाळी तलावाच्या काठावर त्या मुलांचे कपडे दिसल्याने त्यांच्या घरातल्या लोकांना संशय आला. त्यांनी त्वरित अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. त्यांनी त्या तलावात शोधाशोध केल्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे बिडी कामगार परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी आडगाव मधील पोलीस यंत्रणा अधिक तपास करीत आहे.