Navi Mumbai: नवी मुंबईतील सिंप्लेक्स सोसायटीतील रहिवासी पुनर्विकासातील दादागिरीविरोधात आक्रमक
नवी मुंबई घणसोली सेक्टर ७ येथील सिंप्लेक्स सोसायटीतील रहिवाशांनी पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या दादागिरी, दबाव आणि फसवणुकीविरोधात आवाज उठवला आहे. सोसायटीतील इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असल्या तरी रहिवाशांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोसायटीमध्ये सुमारे ८०० कुटुंबे राहतात. अनेक रहिवाशांना गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून भाडे मिळालेले नाही. काहींची घरे जबरदस्तीने रिकामी करून घेतल्याचेही रहिवासीयांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत.
IIT खडगपूर आणि VJTI मुंबई यांनी या इमारती राहण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. तसेच PWD, कोकण आयुक्त आणि शहर अभियंता यांनीही इमारती धोकादायक असल्याचे मान्य केले आहे. मात्र, नवी मुंबई महापालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यावेळी रहिवाशांनी विकासाला विरोध नसून अन्यायकारक पुनर्विकासाला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.
