पवार-मोदी भेटीवर नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण…
दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली. ते जवळपास 1 तासाहून अधिक काळ चर्चा करत होते. या भेटीनंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी काल पियुष गोयल यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही ते भटले.
आता ही नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलंय.
पीयुष गोयल यांची राज्यसभेचा नेता म्हणून भाजपने घोषणा केल्यानंतर काल शुक्रवारी गोयल यांनी स्वत:हून शरद पवार यांची भेट घेतली. नेता बनल्यानंतर एक कर्टसी कॉल म्हणून पवारांची भेट घेतली. नेहमीप्रमाणे, परंपरेनुसार, सदनाचा नेता म्हणून सहकार्य मागण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यानुसारच ही भेट झाली होती, असे मलिक म्हणाले.
सोबतच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ऑफिसमध्ये एक बैठक झाली, ज्यामध्ये पवार साहेब, माजी संरक्षण मंत्री काँग्रेसचे नेते ए के अँटोनी त्या बैठकीला होते. त्याच बैठकीला चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत देखील उपस्थित होते. या बैठकीत सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा झाली. माहिती दिली गेली. त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.