नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या?, शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस : तृप्ती देसाई
लोकशाही न्यूज नेटवर्क | राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आता सामाजिक क्षेत्रातूनही मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.
यावरुन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या की, नीलमताई गोऱ्हे, सुप्रियाताई सुळे, यशोमतीताई ठाकूर हरवल्या आहेत. कृपया कुणाला दिसल्यास सांगावे. ही माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, यासोबतच असे म्हणत तृप्ती देसाई यांनी महिला नेत्यांवर टीका केली आहे.
"तरी तुम्ही तिघी कार्यरत असलेल्या पक्षाच्या, युतीच्या 'महाविकास आघाडी सरकार'च्या मंत्रीमंडळात धनंजय मुंडे मंत्री आहेत. म्हणून 'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे' अशी भूमिका तुम्ही घेत आहात असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. महिलांचे सबलीकरणासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले, तर त्याविषयी बोलायचे नाही अशी भूमिका जर तुमच्यासारख्या महिला नेत्या घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होऊ शकत नाही.
या प्रकरणावर जाहीरपणे बोला, रेणू शर्माला सध्या तुमची जास्त गरज आहे. असे तृप्ती देसाई यांनी सांगितेल. तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे. रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सर्व गोष्टी सांगितल्यामुळे "एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली" असा संदेश जनतेमध्ये जात आहे, जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

