Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशपांडे-धुरी यांच्या अटकेचे षडयंत्र; फडणवीस मदतीला धावले, लोकशाही मराठीवर नितेश राणेंचा गौप्यस्फोट
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटक करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असा खळबळजनक दावा भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. ‘लोकशाही मराठी’ या वृत्तवाहिनीवर दिलेल्या सविस्तर मुलाखतीत नितेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा गौप्यस्फोट करत, त्या काळात विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे देशपांडे आणि धुरी यांच्या मदतीसाठी ठामपणे उभे राहिल्याचे सांगितले.
नितेश राणे म्हणाले की, प्रत्येक पक्ष निवडणुकीनंतर आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करतो. मात्र सध्या विरोधकांकडे ही ताकद कमी होताना दिसत आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे संतोष धुरी यांचा मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश. मनसे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘सरेंडर’ झाली असल्याचे धुरी यांनी केलेले विधान हे केवळ व्यक्तिगत नाराजी नसून, मनसेतील अस्वस्थतेचे प्रतीक असल्याचा दावा त्यांनी केला.
मानसन्मान न मिळाल्याने नाराजी
मनसेतील संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांसारख्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे राज ठाकरे आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या राजकारणात या कार्यकर्त्यांना योग्य तो मानसन्मान मिळाला नाही, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
“राज ठाकरे यांच्या मोजक्या पण निष्ठावान सहकाऱ्यांना चर्चेतही स्थान दिले गेले नाही. आदित्य ठाकरे यांनी अनौपचारिक चर्चांमध्येही या कार्यकर्त्यांना उभे राहू दिले नाही. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ते दुखावले गेले,” असे ते म्हणाले.
अटकेचा डाव आणि फडणवीसांची भूमिका
नितेश राणे यांनी सर्वात गंभीर आरोप करताना सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाच्या काळात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना चुकीच्या केसेसमध्ये अडकवून अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. “पंधरा दिवस या दोघांना अटक करण्याचे षडयंत्र सुरू होते. त्या काळात त्यांना मदत कोणी केली? तर देवेंद्र फडणवीस यांनी. ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले,” असा दावा नितेश राणे यांनी केला.
फडणवीसांचे नेतृत्व ‘मॅग्नेट’
देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे प्रत्येक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असल्याचे नितेश राणे म्हणाले. “फडणवीस साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळत असेल तर कोण काय सोडणार? आम्ही फक्त माध्यम आहोत, पायऱ्या आहोत. खरे आकर्षण हे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे,” असे ते म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे प्रत्येक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असल्याचे नितेश राणे म्हणाले. “फडणवीस साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळत असेल तर कोण काय सोडणार? आम्ही फक्त माध्यम आहोत, पायऱ्या आहोत. खरे आकर्षण हे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आहे,” असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगावर दुटप्पी भूमिका
निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या विरोधकांवरही नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केला. “लोकसभेचा निकाल आपल्या बाजूने लागला तेव्हा निवडणूक आयोग चांगला, पण सहा महिन्यांनी विधानसभेचा निकाल मनाविरुद्ध लागला तेव्हा तो वाईट हे सोयीचे राजकारण आहे,” असा टोला त्यांनी लगावला. बिनविरोध निवडणुका या उमेदवारांच्या निर्णयावर होतात, त्यात कोणावरही जबरदस्ती नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
