पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही; उदय सामंत यांची मोठी घोषणा!
बारावी परीक्षेच्या निकालानंतर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे.
व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सीईटीचे धोरण जाहीर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने महाविद्यालयांना तुकड्या वाढवण्याची मागणी करणारे पत्र देण्याचे आदेश दिले आहेत.
एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा दावाही यावेळी उदय सामंत यांनी केला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा 26 ऑगस्टपासून होणार आहे.आठ दिवसांत अभ्यास करुन ज्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, त्या ठिकाणचे कॉलेज सुरु करण्याच्या सूचना कुलगुरुंना दिल्या आहे.