जळगाव वसतीगृहातील गैरप्रकाराबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाची गृहमंत्री अनिल देशमुखांना नोटीस
जळगाव वसतीगृहातील गैरप्रकाराबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. अनिल देशमुख यांनी जळगाव प्रकरणात तथ्य नसल्याचे म्हटले होते. यावरून विरोधकांनीही टीका केली होती.
जळगावमधील एका शासकीय वसतिगृहात महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांनी नाचायला लावल्याचे सांगण्यात येत होते. याच्या चौकशीसाठी चार सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीच्या चौकशीनुसार, पोलीस वसतीगृहात आल्याची कुठलीही नोंद नाही. तसेच पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा प्रकार आढळला नाही. 20 फेब्रुवारीला एका वसतीगृहातील मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने गरब्यासाठी घातलेल्या कपड्यांचा त्रास झाल्याने ते कपडे काढून ठेवले, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी विधिमंडळात दिली.
राष्ट्रीय महिला आयोगाने गृहमंत्री देशमुख यांना नोटीस पाठवून जळगाव प्रकरणातील निवेदनावर स्पष्टीकरण मागितले आहे.