गणेशोत्सवानिमित्त निबंध आणि गणेश मुर्ती बनविण्याच्या स्पर्धांचे आयोजन !
पुणे : गणेशोत्सवानिमित्त ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ व ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्याकडून नूतन मराठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धा आणि गणेश मुर्ती बनविणे या दोन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या, यामध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना ‘सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक ; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी’ आणि ‘माझ्या स्वप्नातला सार्वजनिक गणेशोत्सव’ हे दोन विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत 250 ते 300 शब्दात निबंध लिहायचे होते. दि. 4 सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत 1 हजार 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तर याच महाविद्यालयात दि. 1 सप्टेंबर रोजी इको फ्रेंडली शाडू माती पासुन गणेश मूर्ती करण्याची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतही 225 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान या दोन्ही स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे यावर्षीचे महाविद्यालयाचे संपुर्ण शुल्क हे बक्षिस स्वरुपात ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ यांच्याकडून दिले जाणार आहे. तसेच या विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षिस समारंभ दि.20 सप्टेंबरला मंडळाच्या आवारात होणार आहे.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण होण्यासोबतच गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाला सामाजिक स्वरूप कसं देता याबाबतच्या कल्पनाही पुढं येतील. जेणेकरून त्यात काही अभिनव कल्पना असतील तर त्याची अंमलबजावणी करण्याबाबतही विचार करता येईल.