Onion : आता 24 रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना, नेमकी काय आहे 'ही' योजना
थोडक्यात
मुंबईत 24 रुपये किलोने मिळणार कांदा
केंद्र सरकारची सवलत योजना
फिरत्या वाहनाद्वारे विक्री
(Onion) कांद्याचे भाव हे वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहेत. याच महागाईच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने कांदे विक्रीची योजना सुरू केली आहे. यामध्ये मुंबईतील विविध भागांत फिरून बाजारभावापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना कांदे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथे किलोमागे २४ रुपयांना कांदे विक्रीची योजना सुरू केली आहे. ‘एनसीसीएफ’, ‘नाफेड’ आणि केंद्रीय भांडार या सहकारी संस्थांमार्फत सुमारे २५ टन कांदा या शहरांमध्ये ‘बफर स्टॉक’मधून विकला जाणार आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीमध्ये विक्रीसाठी फिरत्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवला.
यासोबतच अन्य शहरांमध्येही अशा प्रकारे कांद्याची विक्री करण्यात येणार आहे. गेल्यावर्षीसुद्धा ही योजना राबवण्यात आली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज साधारण दहा टन विक्री होणार असल्याची अपेक्षा ‘एनसीसीएफ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता मुंबईत फिरत्या वाहनाद्वारे सवलतीच्या भावात कांदे विक्री सुरू करण्यात येणार आहे.