Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? पुतीन यांच्या दौऱ्यादरम्यान मोठी अपडेट, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. या भेटीपूर्वी अनेक घडामोडी सुरू असून, अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. भारताने रशियाकडून कच्चा तेलाची आयात घटवली आहे हे समोर आले आहे, तर गेल्या दोन दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत (Crude Oil Prices) घसरण सुरू आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान लवकरच शांतता वार्ता सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांनी कच्चा तेलाची खरेदी आत्ताच थांबवली असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे, रशिया भारताच्या मैत्रीखातर कच्चा तेल निर्यातीत अजून सवलत देण्याची शक्यता असल्यामुळे भारताला कच्चे तेल अधिक स्वस्तात मिळू शकते, ज्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दिसू शकतो.
ब्रेंट क्रूड चा भाव GMT 0221 वर 13 सेंट किंवा 0.21% कमी झाल्याने 62.32 डॉलर प्रति बॅरल होता, तर गेल्या सत्रात हा भाव 1.1% घसरला होता. अमेरिकेतील वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट (WTI) क्रूड ऑईल 12 सेंट अर्थात 0.20% नी कमी होऊन 58.52 डॉलर प्रति बॅरलवर व्यापारात आहे. मागील काही दिवसांत कच्चा तेल 1.2% नी घसरला आहे.
रशिया सरकारने बुधवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिनिधींमध्ये सुमारे पाच तास चर्चाही झाल्याची माहिती दिली, पण युक्रेन-रशिया युद्धावर शांतता करार झाला नाही. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान मोठी घोषणा होण्याची शक्यता असून कच्चा तेलाच्या किमती कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर या दोघांमध्ये शांतता करार झाला तर जागतिक अस्थिरतेत घट होण्याची अपेक्षा आहे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी करताना आतापर्यंत डॉलर, रियाल व चीनच्या चलनाचा वापर केला आहे. अमेरिका सतत भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा दबाव टाकत आहे, ज्यामुळे तेल खरेदीत अडचणी येत आहेत. डॉलर आणि रुपया यांच्यामधील चलन विनिमय दरात तफावत झाली असून त्यामुळे भारतीय तेल खरेदीदारांना फटका बसतो आहे. या कारणास्तव भारताने इतर चलनांचा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
एप्रिल 2022 पासून जून 2025 पर्यंत भारताने रशियाकडून रोज 17-19 लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले. या खरेदीमुळे भारताला 17 अब्ज डॉलरची बचत झाली असून भारतीय कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा झाला आहे. मात्र, यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या टॅरिफमुळे भारतीय निर्यातीला 37 अब्ज डॉलरपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असून यामुळे GDP वृद्धीदर 1 टक्के नी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो.
