बापरे ! कोरोनाबाधित रुग्णाऐवजी दुसऱ्याच रुग्णाला दिला प्लाझ्मा
कोरोना बाधित रुग्णांचा लस देण्याबरोबरच प्लाझा देऊन सुद्धा उपचार केले जातात. असेच प्लाझ्मा देऊन उपचार करताना कोरोना बाधित रुग्णाला वगळून दुसऱ्याच कुठल्या रुग्णाला प्लाझ्मा दिले गेल्याची धक्कादायक घटना मीरा भाईंदर मधून समोर येत आहे. या घटनेमुळे दोन्ही रुग्णांच्या जिवाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात बाधित रुग्णाला प्लाझ्मा न देता बिगर कोविड रुग्णाला प्लाझ्मा चढवण्यात आल्याची घटना घडली आहे.नावाच्या गोंधळामुळे हा प्रकार घडला आहे.
30 मार्च रोजी तुलसीराम पांड्या या 48 वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करून सुद्धा तबियत खालावत असल्यामुळे 5 एप्रिलला प्रथम प्लाझ्मा चढवण्यात आला. मात्र तरी देखील परिस्थिती सुधारत नसल्यामुळे पुन्हा प्लाझ्माची आवश्यकता असल्याची मागणी डॉक्टरांनी नातेवाईकांकडे केली. त्यानुसार रुग्णाच्या भावाने 40 हजार रुपये खर्चून प्लाझ्माचा बंदोबस्त केला.
याच दरम्यान रुगालयात ६ एप्रिलला तुळसीदास नावाचे दुसरे रुग्ण देखील दाखल झाले. या रुग्णाचा अद्याप कोरोना अहवाल प्रलंबित होता. मात्र या दोन्ही रुग्णांच्या नावाच्या घोळामुळे 'तुळसीराम' यांना 'तुळसीदास' समजून प्लाझ्मा चढवण्यात आला.
या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तसेच या प्रकारावरून कुटूंबीयांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच आता दोन्ही रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान आता रुग्णालय प्रशासन प्लाझ्माची व्यवस्था करून रुग्णाला प्लाझ्मा चढविण्याचे काम करत आहे.
चौकशी करून कारवाई करणार
केवळ रुग्णांना योग्य उपचार देण्याकडे आमचा भर आहे. तसेच या संदर्भात संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे मुख्य आरोग्य अधिकारी, डॉ. तेजश्री सोनावणे यांनी सांगितले