‘या’ कार्यक्रमाला उपस्थिती लावणारे मोदी ठरणार पहिले भारतीय पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या सागरी सुरक्षेवर डिजिटल माध्यमाद्वारे चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेच्या अध्यक्षपदी असणार आहेत. चर्चेचा विषय 'समुद्री सुरक्षेला प्रोत्साहन देणे: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज' असा असणार आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेचे अध्यक्ष असलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. सागरी गुन्हेगारी आणि असुरक्षिततेसोबत प्रभावीपणे लढण्यासाठी आणि सागरी क्षेत्रात समन्वय मजबूत करण्यासाठी या चर्चेवर लक्ष केंद्रित केले जाईल.
कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, नायजेरिया राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बझौम, केनियाचे अध्यक्ष उहुरू केन्याट्टा, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम चि मिन्ह, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोचे अध्यक्ष (डीआरसी) फेलिक्स त्सिसेकेदी आणि अमेरिकेचे सचिव अँटनी ब्लिंकेन हे सहभागी होणार आहेत.