Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य पोलीस यंत्रणा सज्ज; ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार
(Ashadhi Wari 2025 ) राज्यातील लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली असून, यंदाचा आषाढी वारीचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली असून, लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील 6,000 पोलीस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साहाय्याने देखरेख ठेवण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.
यंदा राज्यात समाधानकारक पावसामुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. अंदाजानुसार 15 ते 16 लाख वारकरी पंढरपूर येथे उपस्थित राहतील. भाविकांची ये-जा सुरळीत पार पडावी यासाठी एस.टी. महामंडळाने गावागावांतून अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. वारकऱ्यांची सोयीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.