बदलापूर पालिकेच्या प्रभाग रचनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

बदलापूर पालिकेच्या प्रभाग रचनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

Published by :
Published on

मयुरेश जाधव | कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी दोन सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करून नवीन प्रभाग रचना तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.मात्र या प्रभाग रचनेच्या कामात पालिकेतील काही अधिकारी विशिष्ठ राजकीय पक्षातील लोकांना झुकते माप देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आशिष दामले यांनी केला आहे.

काही लोकांना सोईस्कर होईल अशा पद्धतीने प्रभागाची रचना करण्यात येत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाकडे सादर करण्यात येणाऱ्या कच्च्या प्रारूप आराखड्याचा मसुदा सध्या बदलापूर शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे याआधीच उपलब्ध झाला असून याबाबतची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे कच्च्या प्रारूप आराखडा तयार करण्याच्या या कामापासून संबंधित अधिकाऱ्यास दूर ठेवण्यात यावे. तसेच त्रयस्त संस्थेमार्फत आराखडा नव्याने तयार करावा, अशी मागणी आशिष दामले यांनी त्यांनी निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हे सर्व राजकीय आरोप असून निवडणुका जवळ आल्यात तर अशा प्रकारचे आरोप सर्वच राजकीय पक्ष करत असतात. अजून या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली नसून हा सर्व आराखडा गोपनीय आहे. -योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com