Prashant Jagtap: प्रशांत जगताप यांनी अखेर शरद पवारांची साथ सोडली, राजीनाम्याने पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीला हादरा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुणे महानगरपालिकेसमोर पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. आजपर्यंतच्या संधींसाठी नेतृत्वाचे आभार मानताना जगताप म्हणाले की, पुरोगामी विचारांसाठी त्यांची सामाजिक-राजकीय वाटचाल सुरूच राहील.
२७ वर्षांपूर्वी सामाजिक-राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हापासून पुरोगामी चळवळ पुढे नेण्याचे एकमेव ध्येय असल्याचे सांगत जगताप यांनी निष्ठेने साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. विधानसभा पराभवानंतरही भीती न बाळगता नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, "मी राजकारणातून बाहेर गेलो नाही. सद्विवेक बुद्धीने आणि सर्व नेत्यांचा मान राखून शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे." हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना मेलाने पाठवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांच्याशी दोन दिवे चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले. २२ डिसेंबरला राजीनाम्याची चर्चा सुरू झाली असून, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीला त्यांचा तीव्र विरोध कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. १५ जानेवारीला होणाऱ्या २९ महापालिका निवडणुकांपूर्वी पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानत जगताप म्हणाले, "सुप्रियांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर-वानवडीत रस्त्यावर उतरून काम केले. कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून येऊन शहराध्यक्ष झालो." या राजीनाम्यामुळे पुणे राष्ट्रवादीत नव्या उलथ्यांचा अंदाज आहे.
