Pravin Darekar on Ladki Bahin Yojana |अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना हफ्ता मिळणार? दरेकर काय म्हणाले?
आता राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर "लाडकी बहीण योजना" अंतर्गत हफ्ता मिळण्याची शक्यता आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "अधिवेशनानंतर हफ्ता देण्याचे नियोजन केले जाईल." महायुतीने जाहीरनाम्यात जे वचन दिले होते, त्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देण्यात येतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
प्रवीण दरेकर यांनी सांगितले, "शासनाची योजना असेल, तर त्यात काही दोष असतील किंवा चुका झाल्या असतील, तर त्याची दुरुस्ती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सदोष खाती असतील, तर मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते की, या योजनेला पुन्हा पारदर्शक पद्धतीने सुस्थितीत आणण्याची आवश्यकता आहे, आणि तेच होणार आहे. लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही. जे वचन दिले होते, ते २१०० रुपये देण्याची योजना सुरू राहील. योजना बंद होणार नाही. अधिवेशनानंतर हफ्ता देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट होईल," अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत.