Prithviraj Chavan on PM Modi
PRITHVIRAJ CHAVAN CLAIMS EPSTEIN EMAILS MENTION PM MODI, SEEKS CLARIFICATION

Prithviraj Chavan on PM Modi: एपस्टीनच्या ईमेलमध्ये ‘मोदी ऑन बोर्ड’चा उल्लेख; हरदीप पुरींचं नावही चर्चेत, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारकडे खुलास्याची मागणी

Epstein Files On Prithviraj Chavan: एपस्टीन प्रकरणात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ईमेलमध्ये ‘मोदी ऑन बोर्ड’ असा उल्लेख असल्याचा दावा केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणात आता भारतातील सत्ताधारी नेतृत्वाशी संबंधित गंभीर आरोप समोर आले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला आहे की, एपस्टीन फाईल्समधील ईमेल्समध्ये ‘मोदी ऑन बोर्ड’ असा उल्लेख आहे. यासोबतच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नावही या ईमेल संवादांमध्ये असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की, एपस्टीन फाईल्समध्ये जवळजवळ ३० वर्षांचा तपशीलवार डेटा आहे. या डेटामध्ये ईमेल्स, पत्रव्यवहार, छायाचित्रे, व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्स यांचा मोठा साठा असून, हा सर्व पुरावा अमेरिकेत एपस्टीनविरोधात चाललेल्या खटल्यांदरम्यान सादर करण्यात आला होता. सध्या ही सर्व कागदपत्रे अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाच्या ताब्यात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

चव्हाण यांच्या मते, २०१४ साली एपस्टीनचा संपर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आला होता. त्या काळात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक सल्लागार मोदींची भेट घेण्यास इच्छुक होते आणि त्यासाठी एपस्टीनकडे मध्यस्थी म्हणून संपर्क साधण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. त्या सल्लागाराशी मोदींचा नेमका काय संबंध होता, यावर सरकारने खुलासा करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एपस्टीनच्या ईमेल्समध्ये हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख असल्याचा आरोप. त्या काळात पुरी हे अमेरिकेतील भारताचे राजदूत होते. त्यामुळे या प्रकरणाचे राजनैतिक पातळीवरही परिणाम होऊ शकतात, असं चव्हाण यांनी नमूद केलं.

एपस्टीन प्रकरणाबाबत माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या प्रकरणाची सुरुवात १९९५–९६ पासून झाली असून, २००५ आणि २०१० नंतर त्याची माहिती अमेरिकेत हळूहळू समोर येऊ लागली. जेफ्री एपस्टीन हा एक धनाढ्य उद्योगपती होता. त्याने अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि उच्चपदस्थ, धनाढ्य व्यक्तींना त्यांचा देहविक्रय केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर झाले होते. या प्रकरणी अनेक पीडित मुलींनी त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते.

ऑगस्ट २०१९ मध्ये न्यूयॉर्कमधील उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात एपस्टीनचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याबाबत अद्यापही अमेरिकेत स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. हे प्रकरण इतकं गंभीर ठरलं की, अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांवर जनतेचा मोठा दबाव निर्माण झाला. अखेर एपस्टीनशी संबंधित ईमेल्स, फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले, ज्यांना संयुक्तपणे ‘एपस्टीन फाईल्स’ असं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर, एपस्टीन फाईल्समधील उल्लेखांबाबत केंद्र सरकारने तातडीने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com