Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्राधान्याने कार्यवाही करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Devendra Fadnavis) राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय शाळांच्या संदर्भात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री यांनी राज्यातील शाळांमधील सध्याची परिस्थिती जाणून घेतली आणि सुधारणा करण्याच्या उपायांवर चर्चा केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अनुकूल वातावरण आवश्यक आहे. शाळांमध्ये सुरक्षितता, आरोग्यदायी सुविधा, स्वच्छता आणि प्रसन्नता यांचा समावेश असावा, जेणेकरून पालकांचा कल शासकीय शाळांकडे वाढेल.

त्यांनी पुढे सांगितले की, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी विविध शासकीय यंत्रणा आणि जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून करण्यात यावी. यासाठी संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा.

या उपक्रमांसाठी जिल्हा नियोजन समित्यांसह महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान निधी आणि जल जीवन मिशन अशा विविध योजनांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी आरक्षित निधी, महिला व बालविकास विभागाकडील निधी, आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांकरिता मिळणारा निधी यांचे प्रभावी नियोजन करून त्याचा उपयोग शाळांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यात यावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com