Pune Municipal Corporation Election 2026
Pune Municipal Corporation Election 2026 Pune Municipal Corporation Election 2026

Pune Election Ajit Pawar : पुणे निवडणुकीत अजित पवारांचा धक्कादायक निर्णय: गुंडाच्या कुटुंबाला उमेदवारी

Pune Election Ajit Pawar: आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Pune Municipal Corporation Election 2026 : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीसाठी वादग्रस्त निर्णय घेतला आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या सोनाली आंदेकर (Sonali Andekar) आणि लक्ष्मी आंदेकर (Lakshmi Andekar) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून या दोघी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून, त्या थेट तुरुंगातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

या दोघी आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्याप्रकरणात आरोपी असून न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधीही अजित पवार गटाने पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर आता आंदेकर कुटुंबातील महिलांना तिकीट दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन देणाऱ्या अजित पवारांच्या भूमिकेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर (Bandu Andekar) कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर (Lakshmi Andekar) आणि सोनाली आंदेकर (Sonali Andekar) यांना निवडणूक अर्ज भरण्याची अटींसह परवानगी दिली होती. त्यानुसार दोघींनी 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र बंडू आंदेकर यांना अर्ज भरण्याच्या वेळी कोणतीही मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे. तसेच सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या सुमारे 5 कोटी 40 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणातही तुरुंगात आहेत. निवडणूक प्रचार करताना त्यांना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

प्रकरण नेमके काय आहे?

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचे नातेवाईक गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर आंदेकर गटातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला. या खुनाप्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांच्यासह एकूण 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला बंडू आंदेकर यांचा मुलगा कृष्णराज उर्फ कृष्णा आंदेकर हा घटनेनंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर यांनी सार्वजनिकपणे “माझ्या मुलाचा शोध घ्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल,” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कृष्णा आंदेकर स्वतः समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला. या पार्श्वभूमीवर आता तुरुंगात असलेल्या उमेदवारांना दिलेल्या तिकिटांमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

थोडक्यात

• अजित पवार नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीसाठी वादग्रस्त निर्णय घेतला
• आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी
• प्रभाग क्रमांक २३ मधून दोघी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार
• या दोघी थेट तुरुंगातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील
• राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे पुणे महापालिकेत राजकीय वादग्रस्तता वाढण्याची शक्यता
• विरोधक आणि स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला वेग

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com